प्राप्य ऐतिहासिक साधनानुसार बडोद्याचा इतिहास २००० वर्षापर्यंत मागे नेता येतो, अंकोटक (सध्याचे अकोटा ) ह्याच्या पूर्वेला
असलेली हि मुळात व्यापारी लोकांनी वसवलेली छोटीशी वसाहत. आजूबाजूला वडाची भरपूर झाडे असल्याने नाव पडले वटपत्रक!!
कालांतराने ह्या नावात वटपत्रक- वतपत्तन - वटोदर- बडोदे- वडोदरा असे बदल होऊन आजचे वडोदरा अस्तित्वात आले . दहाव्या
शतकात गुप्त आणि चालुक्य राजवटींच्या भाग असलेल्या बडोद्यावर काही काळ सोळंकी राजे आणि त्यानंतर मोगलांनी प्रदीर्घ काळ
शासन केले, या राजवटींच्या खुणा आजही बडोद्यात ठिकठिकाणी दिसू शकतात. १६व्या व १७व्या शतकांमध्ये मुघल साम्राज्याच्या
अधिपत्याखाली राहिल्यानंतर अखेर १७२१ साली मराठ्यांना येथून मुघलांना हुसकावून लावण्यात यश आले. १७२१ साली येथे
गायकवाड घराण्याने बडोदा संस्थान स्थापन केले.
बडोद्याचा कायापालट करणारे पुण्यश्लोक श्रीमंत महाराजा सयाजी राव गायकवाड तिसरे, यांचे एक स्वप्न होते की बडोदे
शहर एक शैक्षणिक, औद्योगिक व व्यापारी केंद्र बनावे, आणि त्यांनी आपले स्वप्न सत्यात येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आज
अहमदाबाद आणि सूरत नंतर बडोदा हे पश्चिम भारतातील तिसरे सर्वात मोठे शहर आहे. वडोदरा हे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे
आणि राजधानी गांधीनगर येथून 139 कि.मी. (86 मैल) विश्वामित्री नदीच्या काठावर स्थित आहे.
बडोदा भारतातील महानगरीय शहरांपैकी एक आहे.गायकवाड राजवटीत कला साहित्य स्थापत्य यांना मिळालेला उदार
राजाश्रय आणि नंतरच्या काळातील औद्योगिकीकरण, शैक्षणिक विकास यामुळे बडोदा एक विकसनशील शहर बनले आहे . संपूर्ण
जगभरातून तसेच देशातून विविध प्रकारचे लोक बडोद्याला नेहमी भेट देत असतात. येथे गुजराती, उर्दू, मराठी, हिंदी आणि इंग्रजी
भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्राबाहेर बहुसंख्य मराठी लोकवस्ती असणारे बडोदे हे बहुधा एकमेव शहर असावे.
समृद्ध संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा सांगणारे बडोदे , गुजराथ ची "संस्कार नगरी" म्हणून प्रसिद्ध आहे. दिवाळी,
मकरसंक्रांती , होळी, गुढी पाडवा आणि गणेश चतुर्थी हे उत्सव येथे मोठ्या उत्साहाने साजरे करतात. संपूर्ण देशात नवरात्रातील
गरबा नृत्यासाठी वडोदरा प्रसिद्ध आहे. मकरसंक्रांतीच्या पतंगबाजी आणि आतिषबाजीसाठी बडोदा प्रसिद्ध आहे ..
शिक्षण आणि साहित्य दोन्हीमध्ये बडोद्याच्या लक्षणीय प्रगती केलेली आहे .”महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा” हे
विद्यापीठ, गुजरातमधील सर्वात मोठे विद्यापीठ आहे. विद्यापीठातील “हंसा मेहता वाचनालय” हे आशिया खंडातील सर्व विद्यापीठात
सर्वात मोठे वाचनालय आहे. महाराष्ट्र शारदेची सेवा करणाऱ्या किती तरी साहित्यिकांचा संबंध बडोद्याशी आला आहे, राजकवी
यशवंत , माधव ज्युलियन, ची वि जोशी, हि काही ठळक नावे.
साहित्य प्रेमी लोकांसाठी येथे वडोदरा मध्यवर्ती वाचनालय , जयसिंहराव वाचनालय , प्राच्यविद्या मंदिर या सारखी ठिकाणे आहेत.
वडोदरा आपल्या कला आणि स्थापत्यासाठी देखील ओळखले जाते. गायकवाड राजवटीत कला साहित्य स्थापत्य यांस उदार
राजाश्रय मिळाल्याने बडोद्यास “ कला नगरी' असेही म्हटले जाते..प्रेक्षणीय स्थळांमध्ये लक्ष्मी विलास पॅलेस, बडोदा संग्रहालय आणि
चित्र गॅलरी, सयाजी बाग ,महाराजा सयाजीराव विद्यापीठ, कीर्ती मंदिर, किर्ती स्तम्भ, न्याय मंदिर, खंडेराव बाजार, अरबिंदो
आश्रम, ईएमई मंदिर (दक्षिणामूर्ती मंदिर), हजिरा मकबरा, काळा घोडा, मैराळ गणपती मंदिर, भद्र कचेरी, चार दरवाजा, सुरसागर
तलाव, इत्यादी ऐतिहासिक स्थळे आहेत.
कला रसिकांसाठी प्रख्यात म्युजिक कॉलेज, फाईन आर्ट्स कॉलेज इत्यादी आवर्जून भेट देण्यासारख्या संस्था आहेत.
पश्चिम भारतातील एक महत्त्वाचे औद्योगिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र हे या शहराचे राष्ट्रीय आणि प्रादेशिक महत्त्व आहे. प्रमुख उद्योगांमध्ये पेट्रोकेमिकल्स, अभियांत्रिकी, रसायने, औषधी, प्लास्टिक, आयटी आणि विदेशी विनिमय सेवा यांचा समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांबरोबरच खाजगी क्षेत्रातील इतर मोठ्या प्रमाणावरील उद्योगांची संख्या पण वाढली आहे. विविध प्रकारच्या बँकिंग तसेच आर्थिक सेवा पुरविणाऱ्या अनेक संस्था बडोद्यात कार्यरत आहे.
रोड कनेक्टीव्हीटीसाठी नवे रस्ते, उड्डाणपूल झाले आहेत. वडोदरा जंक्शन रेल्वे स्थानकावरून प्रवाशी जवळजवळ सर्वच भागांमध्ये प्रवास करू शकतात. वडोदरामध्ये मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि बंगलोर यांच्याकडे फ्लाइट कनेक्शन आहेत. वडोदरा विमानतळ येथे ऑक्टोबर 2016 एक नवीन एकीकृत आंतर्राष्ट्रीय टर्मिनल बांधण्यात आले. वडोदरा हे गुजरात मधील पहिले ग्रीन विमानतळ आणि कोचीनंतर भारतातले दुसरे ग्रीन विमानतळ आहे. दिल्ली आणि गांधीनगरला अहमदाबादपासून सुरत आणि मुंबईला जोडणारा नॅशनल हायवे 8, बडोदे शहरातून जातो . शहरात सार्वजनिक वाहतूक- बस, रिक्षा आणि टॅक्सी सेवा सहज उपलब्ध आहेत.
लक्ष्मी विलास पॅलेसबडोदा
बडोदा संग्रहालय आणि चित्र गॅलरी
महाराजा सयाजीराव विद्यापीठ
ईएमई मंदिर (दक्षिणामूर्ती मंदिर)
कीर्ती मंदिर
सयाजी बाग
काळा घोडा
न्याय मंदिर
सुरसागर तलाव
|