संस्थेची स्थापना



संस्थेची स्थापना




संस्कारनगरी बडोदे येथील श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड आणि त्यांच्या पश्चात गायकवाड राजघराण्यातील अन्य नृपतींनीही साहित्य-संस्कृती-कला-क्रीडा अशा बहुविध क्षेत्रांत सातत्यपूर्ण कार्य करत राहणाऱ्या सर्व संस्थांना राजाश्रय दिलेला आहे व आजही श्रीमंत महाराजा रणजितसिंह गायकवाड हे देखील ह्या परंपरेची जोपासना करत आहेत.

देशी भाषांना उत्तेजन देण्यासाठी पु. श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांनी अनेक गोष्टी केल्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कै. चिं. वि. जोशी व कै. डॉ. वि. पां. दांडेकर यांनी ‘मराठी वाङ्‌मय परिषद, बडोदे.’ या संस्थेची स्थापना केली. कोणत्याही देशाचा विकास व समृद्धी या बाबी त्या देशातील माणसांची मानसिक जडणघडण व सुसंस्कृतता यांवर अवलंबून असतात अन्‌ संस्कृतीचे यथायोग्य, प्रभावी दर्शन जर कशातून घडत असेल तर ते तिला अभिव्यक्त करणाऱ्या भाषेतून. आज विज्ञानाच्या-संगणकाच्या युगात इंग्रजी भाषेच्या वाढत्या उपयुक्तततेमुळे, प्रभावामुळे महाराष्ट्रात जिथे मराठीची अत्यंत वेगाने पीछेहाट होत आहे तिथे गुजरातमधील - बृहन्महाराष्ट्रातील स्थिती काय वर्णावी ? हे या संस्थेच्या संस्थापकांनी दूरदर्शीपणाने जाणूनच की काय आजपासून ८० वर्षांपूर्वी ८ फेब्रुवारी १९३१ रोजी या संस्थेची स्थापना केली.


मराठी भाषिक आणि मराठीबद्दल आस्था बाळगणाऱ्या इतर भाषिक साहित्यप्रेमी रसिकांना एकत्र करून वाङ्‌मयाची विविध दालने त्यांना खुली करून देऊन त्याद्वारे बृहन्महाराष्ट्रात मराठी भाषेची अस्मिता जोपासणे, तिचे संवर्धन करणे व लेखक-वाचक यांना संपन्न करणे ही उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून या संस्थेची स्थापना करण्यात आली.



संस्थेतर्फे भरविण्यात येणारी अधिवेशने


इ.स. १९३१ मध्ये या संस्थेची स्थापना झाल्यापासून आजतागायत ८० वर्षांच्या या प्रदीर्घ कालावधीत संस्थेची एकूण चौसष्ट अधिवेशने झाली हे सर्वश्रुतच आहे. ही संस्था प्रतिवर्षी तीन दिवसांचे एक अधिवेशन भरवून विविध साहित्यस्पर्धा (स्थानिक व अखिल भारतीय स्तरावर), चर्चा, परिसंवाद, कविसंमेलने, कथाकथन, नाटक; साहित्य-संगीत-कला-क्रीडा-नाट्य इ. क्षेत्रांतील नामवंतांच्या मुलाखती अशा विविध कार्यक्रमांचे तसेच बहुभाषी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन करीत आली आहे. या अधिवेशनासाठी ख्यातकीर्त साहित्यिकास अध्यक्ष म्हणून बोलाविण्याचा व अधिवेशनाचे उद्‌घाटन राजघराण्यातील व्यक्तीच्या हस्ते करण्याचाही परिषदेचा प्रघात आहे.


संस्थेने आजवर भरविलेल्या चौसष्टही अधिवेशनांचे अध्यक्षपद साहित्यसम्राट न. चिं. केळकर, सर्वश्री स्वा. वि. दा. सावरकर, आचार्य अत्रे, पु. ग. सहस्त्रबुद्धे, सेतुमाधवराव पगडी, कवी अनिल, सौ. विजया राजाध्यक्ष, कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. दिलीप चित्रे, विश्वास पाटील, विजय कुवळेकर, डॉ. अरुणा ढेरे, कुमार केतकर, सुरेश खरे, प्रतिभा रानडे, डॉ. नरेन्द्र जाधव अशा नामवंत साहित्यिकांनी विभूषित केले आहे.



अन्य उपक्रम


तीन दिवसांच्या अधिवेशनांखेरीज अनेक छोटे-मोठे उपक्रम वर्षभर परिषदेतर्फे राबविण्यात येतात. त्यांपैकी एक म्हणजे ‘सुवर्णमहोत्सवी व्याख्यानमाला’. येथील ‘अन्योन्य बँके’ च्या सौजन्याने दरवर्षी या व्याख्यानमालेचे आयोजन गेल्या दहा वर्षांपासून नियमितपणे करण्यात येते. व्याख्यानमालेअंतर्गत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षास अथवा अन्य व्यासंगी साहित्यिकास-विचारवंतास निमंत्रित करून त्याच्या ज्ञानाचा व व्यासंगाचा महाराष्ट्रापासून दूरवर राहून आपली भाषा व संस्कृती यांचे जतन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या, वाङ्‌मयाचा आस्वाद घेण्यास व साहित्यातील नवनव्या प्रवाहांचे ज्ञान करून घेण्यास उत्सुक असलेल्या रसिकांना लाभ घेता यावा हा यामागील कळकळीचा उद्देश. यापूर्वी अन्योन्य साहाय्यकारी बँकेच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेत प्रा. नारायण सुर्वे, डॉ. गो. पु. देशपांडे, बालशंकर देशपांडे, डॉ. य. दि. फडके, मा. नारायण देसाई, प्रा. राम शेवाळकर, मा. मधु मंगेश कर्णिक, डॉ. विलास खोले, डॉ. दिगंबर पाध्ये, मा. अरुण साधू, मा. समीर पळणीटकर, मा. ह. मो. मराठे यांसारख्या विचारवंतांच्या, संशोधकांच्या, संपादकांच्या, साहित्यिकांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांचा लाभ बडोदेकर रसिकांना मिळाला आहे.