९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बडोदे - २०१८

भाषा आणि लेखनकला हे माणसाला व्यक्त होण्यासाठीचे एक माध्यम आहे आणि ह्या माध्यमांच्या आधारे व्यक्त होत असतांना साहित्याची - वाङ्मयाची निर्मिती होत असते. वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य हे माणसाच्या प्रगतीसाठी पोषक असते. अश्या प्रकारे साहित्याचे- वाङ्मयाचे समाजाच्या व पर्यायाने राष्ट्राच्या उत्कर्षात मोलाचे योगदान असते. काळानुसार या साहित्यनिमिर्तीत आणि त्याच्या विषयात अनेक बदल होत असतात. आणि या बदलातून मराठी भाषेविषयीच्या आणि त्याच्या साहित्यविषयीच्या नवीन कल्पना, नवे विचार व काही समस्या समाजासमोर येतात. यावर सर्व विचारवंतांनी संयुक्तरित्या अभ्यासपूर्वक विचार करणे आवश्यक असते. याच हेतूने दरवर्षी महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यात येते.

आजवर अनेक संमेलने झाली. १८७८ साली पहिले मराठी साहित्य संमेलन, गोपाळ हरी देशमुख आणि न्या. रानडे यांनी सर्व ग्रंथकारांना एकत्र करून पुण्यात भरविले. त्यांनतर हि परंपरा आजवर सुरु आहे. १९०९च्या सातव्या बडोदा संमेलनापासून "ग्रंथकार संमेलन" हे नाव कमी होऊन "महाराष्ट्र साहित्य संमेलन" हे नाव रूढ झाले. १९५४ सालच्या दिल्लीत होणाऱ्या संमेलनासाठी महाराष्ट्र हे प्रादेशिक नाव वगळून " अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" हे व्यापक अर्थाचे नाव देण्यात आले.

आनंदाची गोष्ट अशी कि, यंदाचे "९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन" बडोद्या मध्ये - गुजरात मध्ये होणार आहे. गेली ८६ वर्षे मराठी भाषा आणि साहित्याचा प्रचार, प्रसार व संवर्धन यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या बडोद्यातील, "मराठी वाङ्मय परिषद, बडोदे" या संस्थेला संमेलनाचे यजमानपद भूषविण्याची संधी प्राप्त झाली आहे.

स्वतंत्र भारतात बडोदे येथे होणारे हे पहिलेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असून या पूर्वीची बडोद्यात झालेली तिन्ही संमेलने हि ब्रिटिशकालीन भारतात १९०९,१९२१ आणि १९३४ साली झाली होती. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर, साहित्यसम्राट न.चिं केळकर व नारायण गोविंद चापेकर हे अनुक्रमे संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानांतर ८३ वर्षांनंतर पुन्हा एकदा हा मान साहित्य नगरी बडोद्याला मिळाला आहे.

बडोद्याची सांस्कृतिक तसेच साहित्यिक परंपरा लक्षात घेता, हे संमेलन मराठी साहित्य जगातला एक नवा विचार देईल अशी संपूर्ण देशाची अपेक्षा आहे. बडोद्यातील साहित्य संमेलन हे सर्वार्थाने आगळे-वेगळे व्हावे व हे संमेलन केवळ बडोदें शहराचे न राहता संपूर्ण गुजरातचे प्रतिनिधित्व करणारे असावे असा प्रयत्न सुरु आहे.

दि. १६, १७, १८ फेब्रुवारी २०१८ असे सतत तीन दिवस या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन समस्त मराठी साहित्यप्रेमी जनतेचा तीन दिवस चालणार एक आनंददायी सोहळा असेल. यासाठी देशभरातून तसेच विदेशातूनही शेकडो मराठी साहित्यिक, शिक्षक, विद्यार्थी, ग्रंथ प्रकाशक, पत्रकार, मुद्रक, हजारो रसिक वाचक आदि ग्रंथव्यवहाराशी संबंधित मंडळी सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या अंतर्गत विविध चर्चासत्रे, कवी संमेलने, मान्यवरांच्या मुलाखती, पुस्तक प्रकाशन, भव्य ग्रंथ प्रदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त मराठी साहित्यप्रेमी जनता या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकेल यासाठी मराठी वाङ्मय परिषद कार्यरत आहे.